पसारा

alone

मी वादळ, कातळ
पाऊस, वारा
मी भणंग फकीर
मस्त आवारा

मी चिखल, दरी
नदी नाला
मी वीज ग्रहण
तुटका तारा

मी बाभळ, काटा
धूळभरल्या वाटा
मी डोंगरमाथा
उधाणलाटा

मी सोय, सबब
प्रश्नांचा ढिगारा
मी तुकड्या-तुकड्यात
विस्कटलेला पसारा

मी तिरसट, बुरसट
कुजकट पार
मी रक्त मागणारी
आशाळभूत तलवार

मी कोळसा, खाण
नावडतं वाण
मी दिशा नसलेला
सैराट बाण

#Abstract

Advertisements

हलाल मुडद्यांची दुनिया…

web pic

सजीव विचारांचा खून पाडून,

हलाल मुडदे फिरत राहतील जगभर,

पाशवीपणाचा जयजयकार करत…

रक्ताला धर्म, जातीचा वास हुंगत,

बंदुकीच्या गोळ्या आणि तलवार, कोयत्याची निशाणी ठेवत

काळेकभिन्न चेहरे सरेआम कत्तल करत फिरतील जगभर..

पाशवीपणाचा जयजयकार करत…

लेखण्या, विचार, विवेकाला बंदीवान करुन

हिरवे, भगवे, निळे, पांढरे झेंडे फडकवत राहतील

गीता, कुराण, बायबलच्या नावावर खपवतील पापं जगभर…

पाशवीपणाचा जयजयकार करत…

बेघर थडगी साक्ष देतील तुमच्या जिवंत षंढपणाची,

कोत्या-करकोच्या मनाची, खोट्या-कंक ढोंगीपणाची

थंडगार पाशवीपणाची..

निर्जिवपणे.. जयजयकार करत..

मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?

R R

मरने के बाद आदमी का क्या रह जाता है? अमृता प्रीतम यांच्या कोरे कागज पुस्तकातली पहिली ओळ..

आर.आर.पाटील अर्थात आबा गेल्यानंतर पहिल्यांदा आठवली.. ‘मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?’

शांतपणे विचार केल्यानंतर समजलं बरंच काही राहून जातं.

आबा मूळचे अंजनीचे. जन्म 1957 सालचा. 4 एकर शेती. तीसुद्धा त्या काळात कोरडवाहूच. घरची गरीबी. किती टोकाची..?

“तर आबांचा शर्ट फाटला होता. सुई-दोरा घेऊन ते आईकडे गेले, आणि म्हणाले की हा शर्ट कसातरी शिऊन दे. शर्टची अवस्था बघून आई म्हणाली आता कुटं शिवायचा? एकच शर्ट असल्यानं अंगावर काय घालायचं हा प्रश्न होताच. तेवढ्यात सहज आबांची नजर वर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे गाठोड्यात बांधून ठेवले होते. जुने कपडे आबांनी टेलरकडे नेले. गावातल्या टेलरनंही हे कपडे आबांच्या वडिलांचे असल्याचं लगेच ओऴखलं. त्याच्याकडून आबांनी सगळे कपडे आल्टर करुन घेतले. आपल्याकडे मेलेल्या माणसाचे कपडे खरंतर घालत नाहीत. पण देवाघरी गेलेल्या वडिलांचे कपडे घालून आबा घरात आले, तेव्हा आईला डोळ्यातलं पाणी रोखता आलं नाही. त्याही परिस्थितीत मुलांनी शिकावं म्हणून आई आग्रही होती”

( मी कसा घडलो.. या आबांच्या जीवनचरित्रातून )

इतकी टोकाची गरीबी असतानाही आबा शांतीनिकेतन कॉलेजातून बीए झाले. पुढं एलएलबी झाले. याच काळात म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी आबांच्या अंगावर ना नीट कपडे होते, ना पायात चप्पल. पण प्रामाणिक स्वभाव, स्वच्छ चारित्र्य आणि गोरगरिबांविषयीची तळमळ या एकाच धाग्यामुळं आबा पुढं 12 वर्ष सावळज गटातून झेडपीवर निवडून जात होते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी त्यातही सांगली जिल्ह्यातलं पाणीदार राजकारण ज्याला माहिती आहे, त्याला हे किती महाकठीण काम आहे, याची कल्पना येईल.

आबांनी राजकारण केलं, पण तेही घरंदाज पद्धतीनं. छक्केपंजे, काटाकाटी, कटकारस्थानं या वाटेला न जाता आबा प्रामाणिकपणाला चिटकून राहिले. त्यामुळं वसंतदादांनी आणि त्यांच्या पश्चात शरद पवारांनी आबांना कधीही अंतर दिलं नाही.

पुढं 1990 साली आबा पहिल्यांदा विधानसभेवर गेले. तेव्हाही दोन जोडीपेक्षा जास्त कपडे आबांकडे नव्हते. पण आपण गरीब आहोत, म्हणून आबांनी कधी स्वत:ला कमी लेखलं नाही. गरीबी आणि प्रामाणिकपणा ही आबांची ताकद होती. गमावण्यासारखं काही नसल्यानं आबांवर कधी खजिल होण्याची वेळ आली नाही. पण संधी मिळाली तेव्हाही  कधी ओरबाडण्याचा मोह झाला नाही. इथं त्यांच्यावरच्या संस्कारांचा पाया किती मजबूत आहे हे दिसतं.

मुख्यमंत्रीपदावर जोशी असोत की राणे किंवा आणखी कुणी.. आबा सरकारच्या चुकांवर बोट ठेवत राहिले. पण तसं करतानाही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर आबा घसरले नाहीत. विरोधकांवर टीका करणं आणि त्यांना अपमानित करणं यातला फरक त्यांनी कायम राखला.

आजकाल पंचायत समितीवर गेलेल्यांच्या दारात वर्षभरात इनोव्हा आणि फॉर्च्युनर उभी राहते. आणि कालपर्यंत चहाला महाग असलेले नेते करोडोशिवाय बोलत नाहीत त्यांनी जरा आबांकडे बघायला हवं.

rr old one

आबा पहिल्यापासून व्याप असलेला माणूस, कलंदर, डोक्यात कायम चक्री चालू. त्यामुळंच ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केलं. म्हणजे 1999 साली. मोदींच्या आधी जवळपास 15 वर्ष. त्यातून आबांचा गाढा अभ्यास आणि व्हिजन दिसलं. गावागावात चैतन्य संचारलं. गावं हागणदारीमुक्त झाली. उकीरडे गावाबाहेर गेले. रोगराई हद्दपार झाली. बिडी-काडी-दारु बंद झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीचं बळ गावांमध्ये दिसू लागलं. महाराष्ट्रात जे गेल्या 50 वर्षात झालं नव्हतं ते आबांनी करुन दाखवलं. केंद्रानंही ही योजना पुढं उचलून धरली.

2004 ला आबांवर पवारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी टाकली. त्या काळात डान्सबार अर्थात छमछम जोरात सुरु होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिकवरुन तरुण पोरं संध्याकाळी गाड्या करुन पनवेल, मुंबईला यायची. रात्रभर धुडगूस घालून, पैसे उधळून सकाळी पुन्हा गावात. यामुळं कित्येकवेळा अपघात व्हायचे. पोरं अकाली जायची. बारमधल्या पोरींच्या नादी लागून अनेकांचे संसार उध्वस्त व्हायचे. आबांकडे शेकडो तक्रारी आल्या. शेवटी आबांनी सगळा विरोध झुगारुन डान्सबारबंदीचा कायदाच केला. जीवानिशी मारण्याच्या धमक्या आल्या. कोर्टकचेऱ्या झाल्या. पण आबा बधले नाहीत. महाराष्ट्रातल्या हजारो आया-बायांचे संसार आबांनी वाचवले.

राजकारण म्हटलं की उन्नीस-बीस, थोडं खाली थोडं वर आलंच. त्यामुळंच सर्वात वजनदार खात्यावर (गृह) आल्यावर आबांना पक्षातल्या मित्रांनीही बराच त्रास दिला. सांगली जिल्ह्यातही आबांना खाली खेचण्याचे, त्यांचं राजकारण धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. पण आबांनी त्याला कधीही आक्रस्ताळेपणानं उत्तर दिलं नाही. ना कधी आदळआपट केली अथवा मीडियासमोर भडक विधानं करुन ड्रामा केला. आबा शांत राहिले. लोकांमध्ये राहिले. ज्यांच्यामुळं ते इतक्या मोठ्या पदावर पोहोचले त्यांच्याच हातात आबांनी स्वत:ला सोपवलं. त्यामुळंच विरोधकांनी पैशाचा पाऊस पाडला, स्वकियांनी हातमिळवणी केली, तरी आबांना पाडणं काही त्यांना जमलं नाही.

मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांचा, सरंजामशाही नेत्यांचा, पैशेवाल्यांचा, भ्रष्टाचाऱ्यांचा, कंत्राटदारांचा, गुंडांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झाल्यानंतरही आबा मात्र त्या चिखलात कमळासारखे वेगळे राहिले. अगदी बाबा आमटेंनीही आबांची स्तुती केली. अण्णा हजारेंनी तर आबांचा जाहीर प्रचार केला. तो आबांच्या स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक प्रतिमेचा गौरव होता.

“मुंबई हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती रहती है”  या वादग्रस्त वक्तव्यानं संताप उसळला. आबांना राजीनामा द्यावा लागला. त्याच दिवशी आबा सरकारी बंगला सोडून थेट अंजनीला आले. 15 वर्षात आबांनी कधीही आपल्या कुटुंबाला मलबार हिलची हवा लागू दिली नाही. आबा लोकांसाठी मुंबईत झटत राहिले. आणि त्यांची आई-पत्नी शेतात राबत राहिल्या. मुलं झेडपीच्या शाळेत शिकत होती. ठरवलं असतं तर मुंबईत कुठंही सी-फेसला वगैरे आबांना टोलेजंग फ्लॅट-बंगला घेणं शक्य होतं. पण तो मोहसुद्धा आबांना झाला नाही.

आबांनी ना कुठला कारखाना विकत घेतला, ना कुठली शिक्षण संस्था काढली, ना कुठं कंत्राटं घेतली. ना बिल्डरांसोबत पार्टनरशिप केली. नाही म्हणायला तासगावात एक सूतगिरणी सुरु केली. तीसुद्धा लोकांना रोजगार मिळावा म्हणून.

आबा राजकारणात UNFIT होते. त्यांनी राजकारण केलं ते गरजेपुरतं. एरवी कार्यकर्त्यासारखे राहिले.

आज आबा गेल्यानंतर अर्थात ‘मरने के बाद’ काय शिल्लक राहिलं..? तर साधेपणा हा यूएसपी असू शकतो हा विश्वास, गरीबी कमजोरी नव्हे तर ताकद आहे याची जाणीव,

प्रामाणिकपणाचा दर्जा पैसा-पदापेक्षा मोठा आहे यातलं सच्चेपण, ग्रामीण भागातील लाखो गोरगरीब कुटुंबातील तरुणांच्या मनावर कायमचं ठसलं.. स्विस बँकेतल्या वजनदार बँक अकाऊंटपेक्षा आबांचं अकाऊंट मरने के बाद जास्त आबाद आहे..  यापेक्षा आणखी काय राहायला हवं?

भक्तांची दहशत!!!

modi with crowd

आपला समाज आणि देश ३३ कोटी देवांना मानणारा आहे. भक्ती आपल्या अणू-रेणूत भरुन उरते. त्यामुळं या देशात आजवर अन्नाचा आणि पाण्याचाही दुष्काळ पडला, पण भक्त आणि भक्तीचा दुष्काळ अशक्य.

त्याच जोरावर वर्षानुवर्ष अनेकांची दुकानं बिनधोकपणे सुरु आहेत. व्यक्तीकेंद्रीत भक्ती आणि प्रतिक्रियावादामुळं बऱ्याचदा आपला भ्रमनिरास आणि अपेक्षाभंगही होतो. जर सहा-आठ महिन्यांनी न थकता भक्त या दु:खाला सामोरे जातात, त्यांच्या कंट्युनिटीचं कायम कौतुक वाटतं.

यावेळी भक्तांनी नवा देव शोधलाय त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. पण यावेळी मला भक्तांची चिंता फारशी नाहीए, पण त्यांच्या देवाची नक्कीच आहे.

त्याचं कारण शोधायला काही घटनांवर नजर टाकावी लागेल.

मार्च 2004 मध्ये राहुल गांधींनी औपचारीकपणे राजकारणात एन्ट्री करण्याची घोषणा केली. आणि नवा गांधी मीडियाच्या रडारवर आला. राहुल गांधी हे खूप करिश्मा असलेलं नेतृत्व आहे, असा दावा कुणी केल्याचं ऐकीवात नाही. मात्र राहुल ज्यावेळी पहिल्यांदा एका दलित कुटुंबाच्या घरी गेले, जेवण केलं, तिथं एक रात्र राहिले. तेव्हा त्यांच्या भक्तांना उमाळा आला. राहुल गांधींमध्ये त्यांना अचानकपणे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दिसू लागले. त्यावेळी माध्यमांचा प्राईम टाईम आणि प्रिंट मीडियाची पहिली पानं आणि एडिट पेजेस पाण्यासारखी खर्च झाली.

त्यानंतर राहुल गांधी विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱअयाच्या म्हणजेच कलावतीच्या घरी पोहोचले. त्यांनी कलावतीची गोष्ट संसदेतून देशाला सांगितली. तिला मदत मिळाली. कलावतीचं नवं घर झालं. मुलींची लग्नं झाली. त्यावेळी तर राहुल गांधींच्या भक्तांनी आसमंत डोक्यावर घेतला.

उत्तर प्रदेशातल्या एका गावात शुभ्र कपड्यातले आणि पायात स्पोर्ट शूज घातलेले बायसेप्सपर्यंत बाह्या गुंडाळलेले राहुल गांधी रोजगार हमीच्या कामावर माती उचलताना दिसले, हा क्षण भक्तांसाठी अत्युच्च होता.

पण वेळ सरला.. तसं राहुल गांधींचं काम, कुवत आणि कर्तृत्वाचं दर्शन घडलं. ज्या राहुलमध्ये इंदिरा, राजीव दिसायचे तिथं भक्तांना पप्पू दिसू लागला. आणि मग त्याचेही जोक व्हॉट्स अप फेसबुकवर वायुवेगानं फिरु लागले. देवाचा चोळामोळा करायलाही आम्ही मागंपुढं पाहत नाही, हे त्याचं उदाहरण.

आता देव क्रमांक २ म्हणजे आपले अण्णा हजारे..

9 ऑगस्ट 2010 ला जंतर मंतरवरुन अण्णांनी क्रांतीची हाक दिली. उद्या लोकपाल कायदा आला की भ्रष्टाचार बियालाही शिल्लक राहणार नाही. या भाबड्या आशेनं पुन्हा भक्त वेडे झाले. 73 वर्षांच्या अण्णांच्या टोप्या निघाल्या, मेणबत्त्या घेऊन लोक घराबाहेर पडले. व्हिज्युअली इंटरेस्टिंग असलेल्या या इव्हेंटमुळं मीडियाचे कॅमेरे अण्णांवर स्थिरावले. दहा दिवसात अण्णांची क्रेझ करीना आणि कटरीनापेक्षाही वाढली.

तीन महिन्यांनी तोच शो रामलीलावर झाला. भावनेचा भर ओसरला. गर्दीही कमी झाली. राळेगणमध्ये कधीकाळी टाईम्स नाऊ, सीएनएन, एनडीटीव्हीपासून किरकोळ चॅनलचे पत्रकार मुक्कामी असायचे, पण अपेक्षाभंग झाला.. भक्तांनी अण्णांना अव्हेरलं. अण्णा जिथून आले होते पुन्हा तिथंच म्हणजे यादवबाबा मंदिरात पोहोचले.

देव क्रमांक ३ म्हणजे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

रेव्हेन्यू सर्विसेसमध्ये काम केलेला अधिकारी. पण पायात साधी चप्पल, अंगात ढगळा शर्ट घालून देशातल्या सर्वशक्तीमान अंबानी, गांधी यांना थेट प्रश्न विचारतो. या धाडसामुळं भक्तांमधला रोमँटिसिझम चाळवला. अण्णांच्या आंदोलनात पडद्यामागे राहिलेल्या केजरीवालांनी राजकारणाच्या चिखलात उतरुनच साफसफाई करण्याची घोषणा केल्यानंतर भक्त अण्णांना सोडून केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहिले.

जबरदस्त आरोप करुन केजरीवाल यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपसह अन्य पक्षांना सळो की पळो केलं. भक्तांनी फक्त केजरीवाल यांच्या इमानदारीची गाणीच लिहायची बाकी ठेवली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी दिल्ली विधानसभेच्या 28 जागा जिंकल्या. पण सरकारी गाडी, घर घेणार नाही म्हणणाऱ्या केजरीवाल यांनी चांगला टोलेजंग फ्लॅट घेतला. तो सोडण्यासाठी मीडियाला टाहो फोडावा लागला. भक्तांचा पुन्हा भ्रमनिरास.

लोकसभेत पानिपत झालं. गेल्या २ महिन्यात केजरीवाल टेलिव्हिजनवर दिसले नाहीत.

अर्थातच अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनांमुळं भारताला जे मिळालंय, तेही तितकंच अमूल्य आहे. जरी भक्तांनी त्यांची साथ सोडली असली, तरी त्यांनी केलेल्या कामाचं महत्व कमी होत नाही हे तितकंच खरं आहे. (चुका आणि कमतरता वगळून)

असो, तर या सगळ्यानंतर मग भक्तांनी नवा देव शोधला, त्याचं नाव नरेंद्र मोदी. कणखर, कर्तृत्ववान, कुशल, झंझावाती नेता. काँग्रेसपासून पाकिस्तान ते अगदी चायनापर्यंत कुणालाही सुनावायला हा देव मागेपुढं पाहात नाही.

स्वप्नं थेट इंद्रनगरीची दाखवतो. जिथं लोक सुखानं नांदतील, कुणाच्यात वाद नसतील, कुणी त्याच्या भक्तांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही असं राज्य (रामराज्य). भक्त भलते खूश..

आता या भक्तांनी मोदींना डोक्यावर घेतल्यानं पुन्हा भीती वाटू लागलीय. अर्थातच भक्तांची. कारण भक्त सध्या कुठल्याही थराला जाऊन मोदींचं गुणगाण करु लागलेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतित पावन संघटना, बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांसह इतर भक्तगणही सामील झालेत.

(मोदींविरोधात एखादी पोस्ट फेसबुक किंवा ट्विटरवर करुन बघा)

तुम्हाला तातडीनं रिझल्ट अर्थातच (भक्तांच्या) अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागेल

पण तरीही हे भक्त या देवाच्या मागेही काही वर्ष ठामपणे राहतील. त्याला वेळ देतील. असं वाटत नाही.

कारण आपला इतिहास. भारतीय म्हणून आपण प्रचंड प्रतिक्रियावादी. उथळ. भडक. आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. मॅगी किंवा नूडल्ससारखं. आपल्या भावनेचे चढउतार आल्प्स पर्वतातील रांगांसारखे. तीव्र.

ही मानसिकता आपली शत्रू आहे. आपण शांत, स्थिर विचार करत नाही. समोरच्याला वेळ देत नाही.

कदाचित गेल्या 60 वर्षात झालेल्या फसवणुकीमुळं (?) असेल आपला कुणावर फार काळ विश्वास टिकून राहात नाही.

पण आता भक्तांनी बदललं तर बरं होईल. देवाला त्याची ध्येयधोरणं राबवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. अर्थातच वेळोवेळी वर्तमानाच्या कसोटीवर त्याची परीक्षा आणि मूल्यमापनही करावं लागेल. पण आदळआपट आणि उदोउदो नको.

नैतिक आणि तात्विक गोष्टींची तुडवणूक होत असेल तर त्याचा डोळसपणे विचार करावा. तशी प्रतिक्रिया शांततेनं नोंदवावी. ना की भावनेच्या भरात गुलालाची उधळण.

असं झालं तर बदल नक्की होईल. देश, समाज आणि भक्तही एक पाऊल पुढं जातील. आणि इतिहासात एका परिपक्व पानाची भर पडेल.

पण चुकांची पुनरावृत्ती झाली तर पुन्हा प्रेमाचा आवेग, बहर आणि मग नैराश्याची गर्ता हा प्रवास चुकणार नाही. म्हणूनच भक्तांची जबाबदारी वाढलीय इतकंच!

बदल गरजेचा आहे!!!

Image

गोष्ट आहे वाजपेयी सरकारच्या काळातील. आऊटलूकनं पीएमओचं नियंत्रण करणाऱ्या रंजन भट्टाचार्य, ब्रजेश मिश्रा यांच्यावर एकापाठोपाठ एक पर्दाफाश करणारी सीरिज केली.

यामुळं वाजपेयी भलतेच रागावले. संपादक विनोद मेहतांना त्यांनी अक्षरश: समन्सच बजावलं. मात्र मेहतांनी वाजपेयींना फेव्हरेबल होईल असं काही केलं नाही. परिणामी

आऊटलूकचे मालक राजन रहेजांच्या घरावर, कार्यालयावर आणि आऊटलूकच्या मुंबईतील एडिटोरियल विभागावर आयकर खात्यानं छापा टाकला. त्यात काही मिळालं नाही. तरीही

आयकर खात्यानं 51 लाख मिळाल्याचं जाहीर केलं.

ती केस बरेच दिवस सुरु होती. राजन रहेजांना रोज आयकरच्या कार्यालयात बोलावलं जायचं. दिवसभर बसवून ठेवलं जायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलावलं जायचं. कधी 20 वर्षापूर्वीची फाईल मागितली जायची. राजन रहेजा या मानसिक छळाला वैगातले होते.

त्यांनी विनोद मेहतांना फोन केला, आणि हे थांबवणं शक्य आहे का? विचारलं.

विनोद मेहतांनी ब्रजेश मिश्रांना फोन केला. अपॉईंटमेंट घेऊन भेटायला गेले. मेहतांनी सगळं प्रकरण सांगितलं. त्यावर ब्रजेश मिश्रांची प्रतिक्रिया…

“अरे हे काय? मला हा प्रकारच ठाऊक नव्हता. तुम्हाला तर माहिती आहेच की मी आणि वाजपेयीजी फ्रीडम ऑफ प्रेसचा किती आदर करतो! ”

त्यानंतर मिश्रांनी एक-दोन फोन केले, आणि रहेजांच्या मागचं चलांडळ थांबलं. पण त्यावेळी ब्रजेश मिश्रांनी खूप अपमानास्पद वागणूक दिल्याचं विनोद मेहता कधीच विसरले नाहीत.

परवा राहुल गांधींची मुलाखत पाहिल्यानंतर पहिल्यांदा हा किस्सा आठवला. देशातल्या सगळ्यात पॉवरफुल माणसाची मुलाखत घेताना टाईम्स नाऊ आणि एकूणच ग्रुपनं किती मोठी हिंमत दाखवलीय याची जाणीव झाली.

आणि अशी मुलाखत देण्याची हिंमत राहुलनी दाखवली ही बाबही तितकीच कौतुकास्पद आहे.

मुलाखतीदरम्यान अडचणीच्या प्रश्नांवर राहुल गोंधळले, थांबले. पण नरेंद्र मोदी करण थापर यांच्या मुलाखतीतून जसे उठून निघून गेले, तसा उर्मटपणा किंवा पळपुटेपणा त्यांनी केला नाही.

आता राहुल गांधींची अवस्था पाहून नरेंद्र मोदी अशा वन टू वन मुलाखत देण्याचं धाडस दाखवण्याची शक्यता कमीच.  

असो, तर अर्णब गोस्वामी यांनी कुठलीही तमा न बाळगता राहुल गांधींवर अडचणीच्या प्रश्नांची कठोरपणे सरबत्ती केली. अतिशय बिनधास्तपणे, आत्मविश्वासानं तरीही विनम्रपणे प्रश्न विचारुन अर्णबनं राहुल गांधींना घाम आणला. (मुलाखतीच्या चाळीसाव्या मिनिटाला राहुल अक्षरश: घामाघूम झालेत हे दिसतय. तेही दिल्लीत सगळ्यात लो टेम्परेचर असताना)

अर्थात देशातील महाबलशाली लोकांना प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंबहुना ते उत्तराधिकारी जसे आहेत तसे उत्तरं देण्यास बांधीलही आहेत हे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी लोकांना लक्षात आणून दिलं. लोकांना प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास दिला. अर्णब गोस्वामींचं काम गेल्या तीन वर्षातील देशपातळीवर झालेल्या आंदोलनांमुळं थोडं सोपं झालं यात कुणाचंही दुमत नसावं.

या मुलाखतीमुळं राहुल गांधींच्या कुवतीचं क्रिटिसिझम सुरु झालं तो वेगळा भाग. पण गुडी-गुडी प्रश्न विचारणं, अजेंडा विचारणं, गुडबुक्समध्ये जाण्याच्या घाईसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आणि मुलाखतकार यांचं पितळ उघडं पडलं.

अर्णब गोस्वामी यांची मुलाखत पाहिल्यानंतर पहिला प्रश्न मनात आला तो, हा की मराठी पत्रकारितेत हे कधी होणार? इतक्या कठोरपणे आपण लोकांचे प्रश्न मुलाखतकार म्हणून कधी मांडणार?

शरद पवारांना 1993 च्या स्फोटानंतर दाऊदचे काही साथीदार शरद पवारांसोबत विमान प्रवासात होते, हे आयोगाच्या चौकशीत आधोरेखित झालय.

1997 ला गोपनीय अहवाल आऊटलूकनं छापल्यामुळं मोठा गहजब झाला होता. त्यावर शरद पवार आणि आऊटलूक यांच्यात कोर्टबाजीही झाली.

पण त्यानंतरही पवारांच्या मराठीत शेकडो मुलाखती झाल्या,

त्यात कुणीही पवारांना दाऊदच्या निकटवर्तींयांसोबत तुम्ही काय करत होतात?  लवासा उभारताना सीआरझेड आणि इतर नियमांची मोडतोड तुम्ही राज्यकर्ते असूनही कशी होऊ दिली? अतिशय हीन पातळीला जाऊन तुम्ही जातीचं राजकारण का केलंत? (अगदी भांडारकरवर हल्ला ते राजू शेट्टींची जात काढणं..) महाराष्ट्रातल्या शेकडो एकर जमिनी तुमच्या मंत्र्यांनी (तटकरे) कशा विकत घेतल्या?  अजित पवारांच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्यावर तुम्ही शांत का राहीलात? भुजबळांवर एमआयटीतील घोळापासून ते महाराष्ट्र सदनाच्या गैरव्यवहारावर अनेक आरोप झाले. तरीही एकाही घोटाळेबहाद्दराला तुम्ही मंत्रिमंडळातून का हटवलं नाहीत? हे आणि असे शेकडो प्रश्न का विचारले नाहीत?

किंवा

गोपीनाथ मुंडे, अजित पवार, नितीन गडकरी यांनी सहकारी कारखाने मोडीत काढून खासगी कारखाने कसे विकत घेतले? शेतकऱ्यांचे शेअर्स, कारखान्याला दिलेल्या जमिनी यांचे करोडो रुपये काही लाखात कसे खिशात घातले? टोलनाक्यांच्या ठेकेदारीत अप्रत्यक्षपणे सगळ्या पक्षांच्या नेत्यांची भागीदारी कशी असते?

राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट कुठल्या कारखान्यात छापायला टाकली आहे? टोलचं आंदोलन त्यांनी मधेच कसं सोडून दिलं? त्यांच्या कंपन्यांना पुनर्विकासाचे प्रकल्प मिळण्याचं टायमिंग हे निवडणुकीच्या आधी कसं साधतं?

संजय काकडेंनी उमेदवारी दिल्यानंतर एकाही राजकीय पक्षानं उमेदवारी का दिली नाही? 485 कोटीचा उमेदवार आणि त्याचे सर्वपक्षांशी असलेले संबंध कसे राज्यसभेला जाण्यासाठी शिडी ठरले?

संदीप बाजोरीया, मितेश भांगडिया, अभय संचेती यांच्यासह अनेक ठेकेदारांना राजकारण्यांनी कुठल्या मेरीटवर विधानपरिषद, राज्यसभा वाटल्या?वर्षानुवर्ष, रस्ते, टोल, उड्डाणपूलासह शेकडो कामांचे ठेके त्याच कंपन्यांना आणि ठेकेदारांना कशा जातात?

कुणीही हे प्रश्न विचारत नाही. अर्णब गोस्वामी यांनी लोकांच्या मनातले प्रश्न विचारुन मुलाखतीचा स्टेटस बार सेट केला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पत्रकारितेत आणि पत्रकारांमध्ये कायमच फरक राहिलाय. तो फरक आर्थिक, मानसिक, वैचारीक आणि व्यक्तीमत्वाच्या पातळीवरही कायम होता. आहे.

गेल्या तीसएक वर्षातील कुठल्याही मराठी पत्रकारांनी, संपादकांनी असे प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली नाही. उलट नेत्यांच्या गुडबुक्समध्ये किंवा त्यांच्या मर्जीत राहण्यात धन्यता मानली हे सत्य आहे. काही चांगले पत्रकार याला अपवाद आहेत हे नक्की.

अर्थात मराठीतली सगळीच दैनिक कुठल्या न कुठल्या पुढाऱ्यांची आहेत, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ताचा अपवाद वगळता. त्यामुळं काम करताना मर्यादा होत्या. आहेत.

मात्र आता नेटकऱ्यांच्या हातातल्या मोबाईलमध्ये सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं मराठी पत्रकारितेला दुबळं हे विशेषण लागण्याआधी धाडसी प्रयोग करण्याची गरज आहे.  नाहीतर समकालीन इतिहासात मराठी पत्रकारीतेविषयी लिहिण्याजोगं काहीच उरणार नाही.

टोबा टेक सिंग !

manto
आज टोबा टेक सिंग नाटक पाहायला गेलो होतो. शिवाजी मंदिरात. पाटील सरांसोबत. सआदत हसन मंटोच्या कथेवर आधारीत. फाळणीवरचं सगळ्यात उत्तम साहित्य, कलाकृती असतील त्यात मंटोच्या टोबा टेकचं नाव पहिलं आहे. कॉलेजच्या मुलांनी बसवलं होतं नाटक. प्रयत्न छान होता.

 घरी येतानाच फाळणीबाबतचे विचार डोक्यात घोळत होते. ते दिवस कसे असतील?  नेमकं काय झालं असेल त्यावेळी? नुसती कल्पना करुनच काळीज हादरुन गेलं. रक्तपात, लूटपाट, अब्रूची लक्तरं आणि त्याहूनही भयंकर म्हणजे आपल्याच लोकांकडून होणारी प्रतारणा कुठल्याही शब्दात बांधणं कठीण. दु:ख आणि भयानकता मोजायला कुठलंही परिमाण पुरणं अशक्य.

 फाळणी म्हणजे विषप्रयोगच. ज्याचे परिणाम शेकडो वर्ष इतिहास, भूगोल आणि वर्तमानावर होत राहतात. मनं दूषित होतात. दुरावतात.

 बसायची जागा बदलली तरी माणसं अस्वस्थ होतात. ऑफिसात त्याच खुर्चीसाठी माणसं हटून असतात. मग वर्षानुवर्ष ज्या मातीत वाढली, ती जागा, ती घरं, तो  परिसर, कष्टानं उभा केलेला संसार सोडून निर्वासित व्हावं लागल्यावर काय होत असेल? किंवा झालं असेल?

 जी माणसं कालपर्यंत भाई, भाऊ, दादा म्हणून हाक मारतात, ती अचानक तलवारी घेऊन उरावर बसल्यावर, अब्रूवर हात टाकायला धजावल्यावर कशी सावरली असतील माणसं?

 कदाचित काही जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. अश्वत्थाम्याच्या माथ्याप्रमाणं भळभळत राहतात. आपलीही स्थिती तशीच आहे. त्यामुळंच ६५ वर्षानंतरही दोन्हीकडे गावागावात, गल्ली मोहल्ल्यात फाळण्या सुरु आहेत.

पाकिस्तानात हिंदू मुली, महिलांना नासवलं जातं. आणि इथं यूपीच्या कुठल्यातरी गावात काही झालं की मुस्लिमांची गावं उठवली, पेटवली जातात. महिलांची अब्रू लुटली जाते.

इंग्रजांनी पेरलेलं फाळणीचं विष दोन्ही देशात भिनलंय. यावर उतारा काय, कसा आणि कधी मिळणार याचं उत्तर कदाचितच कुणी देऊ शकेल.

पण तोवर दोन्ही देशात मंटोच्या बिशन सिंगांचा जीव जात राहील, आणि त्यांना टोबा टेक सिंगसारखी नो मॅन्स लँड नशीबात असेल का? याचीही खात्री नाही…

 असो… ऊपड़ दी गुड़ गुड़ दी एनक्सी दी बेध्याना दी मूंग दी दाल ऑफ दी पाकिस्तान अँड हिंदुस्तान ऑफ दी दूर फिटे मुँह !

सोय आणि पण !

Amitabh-bachcha 1

 

गेल्या काही दिवसात बऱ्याच विषयावर लिहायची इच्छा झाली. पण कधी ऑफिसात उशीर झाला. कधी वेळ मिळाला नाही. तर कधी अचानक मूड गेला. अशा अनेक कारणांमुळं लिहिणं बाजूला राहिलं. केलं.

आज अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग वाचताना मला अचानक वाटलं की हा माणूस इतका वक्तशीर कसा असू शकतो?  गेली २१०० दिवस न चुकता हा कसा लिहू शकला असेल?

वयाची सत्तरी पार केल्यावरही नवे विचार, नव्या कल्पना, नव्या उत्साहानं आणि तितक्याच ताकदीच्या शब्दात मांडणं याला कसं जमत असावं? माहित नाही.

हे सगळं व्हायला माणूस धाडसी असावा लागतो का?  कदाचित हो.

कारण लक्ष्याकडे, सामान्यत: यशाकडे जातानाची प्रक्रिया नक्कीच कष्टदायक असते. पण त्यापेक्षाही अधिक एन्जॉएबल असते. हा प्रत्येकाचा अनुभव आहे.

पण उतार हा जास्त भीतीदायक, कष्टदायक असतो, ती प्रक्रिया एन्जॉएबल करणारा माणूसच अमिताभ होऊ शकतो. म्हणजे….. आपल्यातल्या उणीवा शोधून त्यावर नियंत्रण आणणं कठीण काम. आणि त्याहूनही महाकठीण म्हणजे दुसऱ्यानं आपल्यातल्या चुका दाखवल्या तर त्या मान्य करणं. डोळसपणे.

कारण लहानपणापासून आपल्याला सोईचं ऐकायची,बोलायची सवय लागलेली असते.

अचानकपणे कुणीतरी तुम्ही सोईस्कर आहात याची जाणीव करुन दिली तर त्याची सल म्हणण्यापेक्षा ती जखम भळभळत राहते.

अशा जखमा कुरवाळणं धोकादायक. त्यामुळं सोईचं न ऐकण्याची सवय केली तर जास्त बरं.

अनेकदा चुका ऐकून घेतल्यानंतरही “पण” हा शब्द मधेच डोकावतो. तो स्पष्टीकरण देतो.

चुकीच्या वागण्या-बोलण्याचं समर्थन करतो. आपल्या सुधारण्याच्या बऱ्याच शक्यतांवर हा “पण”  पाणी फिरवतो.

अमिताभकडे पाहताना, त्याला ऐकताना त्यानं स्वत:ला सोईच्या किंवा “पण’ च्या हवाली केलेलं नाही हे दिसतं. स्वत:ला इतक्या कठोरपणे ताळ्यावर आणण्याचं धाडस त्यांनी १५-२० वर्षापूर्वी दाखवलं.

त्यामुळं किमान त्याच्याकडं बघून, वाचून “सोय” बाजूला करणं, आणि “पण” च्या आधी थांबणं जमायला हवं असं वाटतंय. प्रयत्न करुन बघू काय होतं ते.