एक बिहार, एक हार और सौ सवाल !!!

nitish lalu

बरोबर 2 वर्षापूर्वीची गोष्ट. बिहारमधल्या सभेत नरेंद्र मोदींनी नीतिशकुमार यांच्याऐवजी भीम सिंग यांच्यावर हल्ला चढवला. (( जवान सीमेवर जातात, ते शहीद होण्यासाठीच असं वक्तव्य करुन भीम सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. )) बिहार भाजपनं भीम सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध करत एक दिवसाचा बंद पुकारला. भीम सिंग त्यावेळी नीतिशकुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. नंतर जीतनराम मांझींसोबत गेले. पण बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झाल्यानंतर हेच भीम सिंग सन्मानानं भाजपात दाखल झाले. अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं  सत्तेसाठीचं डेस्परेशन यातून दिसून येतं. भीम सिंग हे अतिमागास वर्गातून येतात. बिहारमध्ये 101 ईबीसी जाती आहेत, आणि टक्केवारीत सांगायचं तर त्यांचा आकडा 30 टक्क्याच्या घरात आहे. दुसरीकडे जीतनराम मांझी, रामविलास पासवान आणि कुशवाहांना जवळ करुन नरेंद्र मोदींनी 16 टक्के महादलित आपल्या बाजूनं राहतील याची काळजी घेतली होतीच.

मग तरीही नरेंद्र मोदी आणि शाह यांचं सत्तेचं गणित चुकलं कुठं?  बिहारी जनतेला गृहित धरलं का?  महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगडमधला विजयाचा अश्वमेध नीतिश लालूंनी कसा रोखला?

बिहारची परीक्षा सोपी नाही याची जाणीव मोदी-शाह यांना पहिल्या दिवसापासून होती. त्यामुळंच त्यांनी आपली रणनीती सावधपणे आखली.

बिहारमधले लोक राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रापेक्षा जास्त सजग आहेत. त्यामुळंच मोदींनी लिलाव पद्धतीनं जे सव्वा लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं, ते लोकांना फारसं रुचलं नाही. उलट मोदींनी बिहारला कमी लेखल्याची भावना जास्त दृढ झाली. आपल्या देशातल्या प्रांतिक अस्मिता फार कडवट आहेत. त्यांना आव्हान देऊन राष्ट्रीय राजकारण करता येत नाही. त्यामुळंच महाराष्ट्रात छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ अशी टॅगलाईन भाजपनं वापरली. पण तसं बिहारमध्ये झालं नाही. बिहारी जनतेला भावनिक आवाहनाऐवजी मोदींनी अपमान केल्याचं जास्त बोचलं. अर्थात नीतिशकुमार यांनीही बिहारला दिलेलं पॅकेज कसं फसवं आहे याचं गणित जाहीरपणे मांडलं. त्यापुढं जाऊन बिहारला भीकेची गरज नाही असं ठासून सांगत बिहारींच्या स्वाभिमानाला हात घातला.

worried modi

जी स्ट्रॅटेजी मोदींनी लोकसभेत काँग्रेसविरोधात वापरली, तीच लालू-नीतिश यांनी बिहारमध्ये मोदींविरोधात.

म्हणजे मोदींनी लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या संदर्भानं राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्यामुळं वैतागलेल्या प्रियंका गांधींनी मोदी “ नीच “ राजकारण करत असल्याचा आरोप केला. मोदींनी त्याला थेट जातीशी जोडलं.

प्रियंका गांधींनी आपल्याला ‘ खालच्या जातीचा ’ असल्याचं हिणवल्याचा प्रचार मोदींनी केला.

तसं बिहारमध्ये मोदींनी नीतिशकुमार यांच्या डीएनएमध्येच प्रॉब्लेम असल्याचं वक्तव्य केलं.  त्याला नीतिशकुमारांनी बिहारी जनतेच्या डीएनएशी जोडलं. तर मोदी आपल्याला शैतान म्हणाले असा प्रचार लालूंनी राज्यभर सुरु केला. 14 ते 16 टक्के यादवांचा हा अपमान असल्याचं सांगायला लालू कमी पडले नाहीत. मोदींनी लालूंचा काळ जंगलराज होता असं म्हटल्यावर तो मुद्दाही लालूंनी थेट “ बिहारी जंगलराज करतात “ अशा पर्सनल लेव्हलवर आणून ठेवला.

आता बोला !

लालू आणि नीतिशकुमारांनी मोदींना आपल्या पीचवर खेळायला भाग पाडलं. आणि मोदींच्या प्रत्येक बॉलवर सिक्सर ठोकला.

mohan-bhagwat

त्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लालू-नीतिश मोलाची मदत केली. पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत..

“ नेहमी आरक्षण हा मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला गेला. लोक सोयीसाठी आपल्या समुदायाचे गट निर्माण करुन आरक्षणाची मागणी करतात. अनेक लोक याचं समर्थनसुद्धा करतात. मला वाटतं एका बिगर राजकीय समितीची स्थापना करावी. ती समिती कोणाला किती काळ आरक्षणाची गरज आहे हे ठरवेल ”

असं मोहन भागवतांनी म्हटल्याबरोबर लालू-नीतिश यांनी भाजपचा अजेंडा दलित आरक्षण रद्द करण्याचा आहे असा प्रचार सुरु केला. जो पूर्ण यशस्वी झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण मांझी, पासवान, कुशवाहा अशी महादलित नेत्यांची फौज असतानाही भाजपला त्याचा कणभरही फायदा झाला नाही.

पंतप्रधान कुठल्यातरी एका विचाराच्या बाजूला झुकणारा असू शकतो, मात्र तो भेदभाव किंवा द्वेषाचं राजकारण करणारा असून चालत नाही. दादरीत जमावानं अखलाकची घरात घुसुन हत्या केली. वाद पेटला. आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.

त्यात संगीत सोम, साध्वी प्राची, योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज या वाचाळवीरांच्या बेछूट बोलण्यानं मुस्लिमांमधली असुरक्षित भावना आणखी ठळक केली.

याच काळात बिहारच्या प्रचाराचा धुरळा उडत होता.

त्यामुळं दादरीवर मौन बाळगणं हा मोदींचा निर्णय होता, तो अपघात नव्हे!

त्यामागे हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण होईल अशी अपेक्षा होती. मात्र मोदींना जातीय राजकारणाच्या कोड्यात अडकवून लालू-नीतिश यांनी तो डाव उधळून लावला.

सकाळ संध्याकाळ नेत्या-अभिनेत्यांना वाढदिवसाचे ट्विट करुन शुभेच्छा देणारे मोदी दादरीवर जाणून-बुजून थंड आहेत, याचा प्रचार जोमानं झाला. आधीच असुरक्षित भावनेनं घेरलेला मुस्लिम समाज बिहारमध्ये एक झाला. आणि 16 टक्के मुस्लिमांनी भाजपकडे पाठ फिरवली. 30 टक्के ईबीसी आणि 16 टक्के मुस्लिम भाजपला सोडून गेले होते. त्यामुळं दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईपर्यंतच नरेंद्र मोदी अर्धी लढाई हरले होते.

ज्या बिहारनं लोकसभेत मोदींना 40 पैकी 22 जागा दिल्या. त्याच बिहारनं दीड वर्षानंतर विधानसभेच्या 243 जागांपैकी मोदींना फक्त 53 जागा दिल्या. त्यासुद्धा 31 सभा घेतल्यानंतर. देशाच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानानं राज्याच्या निवडणुकीत इतक्या सभा घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

advani, joshi & sushma

आता दुसरा मुद्दा. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत 40 जणांची नावं होती. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शॉटगन शत्रुघ्न सिन्हा असे सगळे दिग्गज. मात्र मोदी आणि शाह कँपनं यातल्या कुणालाही बिहारमध्ये फिरकू दिलं नाही. राज्यातल्या एकाही नेत्याला निर्णयप्रक्रियेत स्थान नव्हतं.

गेल्या 4 निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नसतानाही विजय मिळाला. त्यामुळं यावेळीही तीच स्ट्रॅटेजी. स्वत:  अमित शाह पटनातल्या मौर्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरच्या सूटमध्ये तब्बल दोन महिने ठाण मांडून होते. सगळे नेते, आमदार, पदाधिकारी त्यांना रिपोर्ट करत होते. कुठं काय करायचं? कुणी कुठं जायचं? सगळं ठरवणार ते अमित शाह.

या एकाधिकारशाहीमुळं भाजपच्या भात्यातील हुकमी अस्त्रंही गंजून गेली. त्यांचा वापर झाला नाही. सुशीलकुमार मोदींसारखा चांगला चेहरा बाजूला पडला. शॉटगन आणि इतर बिहारी नेते प्रचारात नसल्याची नकारात्मक प्रसिद्धी झाली. मोदी-शाह बिहारी नेत्यांना डावलतात अशी आवई भाजपच्याच गोटातून उठली.

इतिहासात मोदींना ज्यांनी विरोध केला, त्यांचं राजकारण संपवण्याचा पॅटर्न धोकादायक ठरला.

(( नरेंद्र मोदी-अमित शाह )) दोघंच जातो आणि निवडणुका जिंकून येतो आणि फटाके वाजवतो या अहंकारी वृत्तीनं घात झाला. अर्थात बराच उशीरा झाला, पण झाला. राजकारणातच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर इगो छोटा असावा लागतो. पण हे मोदी-शाहना कोण सांगणार?

YOU CAN’T BE  INTELLIGENT PERSON ALL THE TIME.

modi& amit shah

नेतृत्वाला भविष्य समजलं पाहिजे. नीतिश त्यात तज्ज्ञ आहेत. वर्षभरापूर्वीच नीतिश यांच्या टीमनं सर्वे केला. ज्यात जेडीयू सपाटून मार खाणार अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर नीतिशनी अभ्यास केला. लालूंच्या लोकसभेत फक्त 4 जागा आल्या तरी 23 टक्के मतं राजदला मिळाल्याचं त्यांनी हेरलं. कुठलाही इगो न ठेवता लालूंना फोन केला, आणि विधानसभा एकत्र लढवण्याचं निमंत्रण दिलं. पहिल्यांदा लालूंनी नीतिशकुमारांना थारा दिला नाही. कारण याच नीतिशकुमार यांनी लालूंचं बिहारमधलं संस्थान खालसा केलं होतं. (( जंगलराजचा प्रचार करुन )) मग नीतिश स्वत: लालूंना भेटायला गेले. आपण जर वेगळे लढलो तर आपल्याला दोघांचाही बाजार उठेल याची जाणीव करुन दिली. मतविभाजन होऊ नये यासाठी काँग्रेसलाही सोबत घेतलं. कारण प्रश्न थेट अस्तित्वाचा होता. लालू-नीतिश-काँग्रेस किती एकत्रपणे लढले तर त्यांनी आपल्या 243 उमेदवारांची यादी वेगवेगळी जाहीर न करता एकत्रित जाहीर केली. लालूंचा बेस आणि स्वत:चा फेस वापरुन नीतिशनी मोदींना बिहारमधून हद्दपार केलं. आणि स्वत: मात्र केंद्रातला पर्याय म्हणून मोदींसमोर उभे राहिले.

त्यामुळं बिहारच्या एका पराभवानं मोदींच्या हुशारीवर, विश्वासार्हतेवर आणि नेतृत्व गुणांवर प्रश्नचिन्हं उभं राहिलंय. कारण एकीच्या बळाचं महत्व जे नीतिशना समजतं, दिसतं ते मोदींना समजलं किंवा कळलं तरी वळत नाही.

मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, स्वत:च्या पक्षात भाजपात, मित्रपक्षात, बाहेरच्या पक्षांमध्ये फक्त शत्रूंची तगडी फळी निर्माण केली. शिवसेना, अकाली दल, तेलगू देसम कुणाशीही मोदींचे चांगले सोडा बरे म्हणता येतील असेही संबंध नाहीत.

वाजपेयी आणि मोदींमध्ये हा फरक आहे. वाजपेयी सर्वमान्य नसतील कदाचित, पण ते सर्वसमावेशक होते. वडाच्या झाडासारखे. ज्याच्या सावलीत लव्हाळे आणि छोटीमोठी झाडंही किरमिज्या किरणांच्या आधारानं जगत राहतील. मोदी अशोकाच्या झाडाप्रमाणं आहेत. कुणालाही सावली नाही. अगदी स्वत:लाही.

(( आता तुम्ही म्हणाल की मोदी कधीच लोकशाहीवादी नव्हते ते हुकुमशाहाच आहेत. तर हुकुमशाहालासुद्धा सर्वमान्यता असावी लागते, आणि बंड होणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. जे भारतासारख्या अवाढव्य देशात मोदींच्या आवाक्यापलीकडचं काम आहे. ))

2013 ला जेव्हा नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला आव्हान दिलं होतं, तेव्हा कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर वगैरे मंडळी ज्या उन्मादानं वागली, त्याच उन्मादानं मोदी-शाह यांनी वर्ष-दीडवर्ष पक्षात आणि केंद्रात कारभार केला.

पण केजरीवाल यांनी गांधी घराण्याला हरवता येणं शक्य आहे, तसं मोदी-शाह यांना धूळ चारणंही अवघड नाही हे दिल्लीत दाखवून दिलं होतं.

नीतिशकुमार आणि लालूंनी बिहारमध्ये त्यावर शिक्कामोर्तब केलंय.

आता पुढं पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळच्या निवडणुका आहेत. त्याअगोदरच मोदींविरोधात ममता, अरविंद केजरीवाल, नीतिशकुमार यांची आघाडी झालीय.

या फौजेला कुठल्याही क्षणी मुलायम, पवार, जयललिता, करुणानिधींचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (( सीबीआयची भीती दाखवून दूर ठेवलं असलं तरी.. ))

त्यामुळं मोदी अभिमन्यूप्रमाणं चक्रव्यूहात तर गेलेत, पण बाहेर येण्याचे अनेक रस्ते त्यांनी स्वत:च बंद केलेत. (( कायमचे? ))

आणि या सगळ्यांचं नेतृत्व अर्थातच मिस्टर कूल असलेल्या नीतिशकुमार यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे.

ज्याप्रमाणं 2002 च्या गुजरात दंगलीनंतर कायम मोदींवर टीका करुन सोनिया गांधी आणि काँग्रेसनं आपला शत्रू तयार केला आणि वाढवला. तसं मोदींनी बिहारची निवडणूक हरून स्वत:साठी तगड्या शत्रूची निवड केलीय. जो हिंदू-मुस्लिमांसकट सगळ्या देशाला मान्य होईल. आणि विकासपुरुष असण्याची पात्रताही पूर्ण करेल.

त्यामुळं मोदींची खरी परीक्षा 2014 च्या लोकसभेपूर्वी नव्हतीच ती लाल किल्ल्यावर पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सुरु झालीय.

कारण आपल्या देशातल्या जनतेकडे मार्क ट्वेननं सांगितल्याप्रमाणं…

डायपर्स आणि राजकारण्यांना वेळेत बदलण्याचं अचाट भान आहे.  

Advertisements

2 thoughts on “एक बिहार, एक हार और सौ सवाल !!!

  1. अभ्यासपूर्ण, थेट आणि परखड. उत्तम विश्लेषण. या जोडगोळीला लवकर भान येवो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s